Tuesday, July 1, 2014

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी :
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येऊ
झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर
नको टाकू भिजवून;

किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना :
वाटेवरई माझा सखा
त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून
मागे फिरव पांथस्थ;

आणि पावसा, राजसा
नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;

नको घालू रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली.

-इंदिरा संत

Tuesday, June 5, 2012

पुन्हा पावसालाच सांगायचे

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात..
तिचे माझे सारे पावसाळे माझ्या मनात भिजून जातात..
पुन्हा पाउस ओला ओला, पुन्हा पाउस बांधून झुला,
तिच्याकडचे उरले झोके, परत करतो माझे मला..
पुन्हा पाउस खूप ऐकतो, पुन्हा पाउस खूप बोलतो,
तिच्या माझ्या गप्पांमधले, तिचे थेंब अलगद झेलतो..
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी..
माझे तिचे आठवण-थेंब पुन्हा पावसालाच मागतो मी...

पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे..

मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे..

घराने मला आज समाजवले
भिजुनी घरी रोज परतायचे..

तुझी आसवे पाझरु लागता
खर्‍या पावसाने कुठे जायचे... 

पुन्हा पावसालाच सांगायचे....


गीत - सौमित्र
संगीत - मिलिंद इंगळे
स्वर - मिलिंद इंगळे , सौमित्र

Sunday, August 21, 2011

ऋतू हिरवा...


ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण
, प्रियसाजण हा श्रावण

भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा

Friday, August 12, 2011

श्रावणमासी हर्षमानसी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत


कवी - बालकवी


Monday, July 4, 2011

चिंब भिजलेले


या रिमझिम झिलमिल पाऊसधारा, तनमन फुलवुन जाती,

सहवास तुझा, मधुमास फुलांचा, गंध सुखाचा हाती,

हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा, उजळुन रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे,

चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले, रंग प्रीतीचे ||धॄ||


ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले, सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनु बघ आले,

लाट ही, वादळी, मोहुनी गाते,

ही मिठी, लाडकी, भोवरा होते,

पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे, दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे ||१||


ऊन आले, पंख आले, रूप हे सुखाचे, रोमरोमी जागले, दीप बघ स्वप्नांचे,

बरसतो मोगरा, थेंब गंधाचे,

भरजरी वेल हे, ताल छंदांचे,

घनव्याकुळ रिमझिमणारा,मन अत्तर दरवळणारा,

ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे ||२||





गीतः प्रवीण दवणे.

संगीतः अजय-अतुल.

गायकः शंकर महादेवन, अमॄता नातू.

चित्रपटः बंध प्रेमाचे (२००७).

रिमझिम पाऊस पडे सारखा

Friday, June 24, 2011

नभ मेघांनी आक्रमिले...

नभ मेघांनी आक्रमिले | तारांगण सर्वही झाकूनि गेले || धृ. ||


कड कड कड कड शब्द करोनी | लखलखता सौदामिनी |
जातातचि नेत्रही दिपोनी | अति विरही जन ते व्याकुळ झाले || १ ||


नभ मेघांनी आक्रमिले...




- कृ. प्र. खाडिलकर (संगीत सौभद्र)
गायक: प्रभाकर कारेकर.

Tuesday, June 21, 2011

घन घन माला नभी दाटल्या


घन घन माला नभी दाटल्या, कोसळती  धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा   ...धृ.

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा   ...१

वर्षाकालिन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा   ...२

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा   ...३


गीत: गदिमा
गायक: मन्ना डे

Friday, June 17, 2011

गडद निळे गडद निळे

गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले

- बा.भ. बोरकर

Thursday, June 16, 2011

श्रावणात घन निळा बरसला...


श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतुन अवचित, हिरवा मोरपिसारा ॥ ध्रु ॥
जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठावर आले, नाव तुझेच उदारा ॥ १ ॥
रंगाच्या रानात हरवले, हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती, थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा ॥ २ ॥
पाचुच्या हिरव्या माहेरी, उन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरु झाले
मातीच्या गंधाने भरला, गगनाचा गाभारा ॥ ३ ॥
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा ॥ ४ ॥


गायक/गायिका: 
लता मंगेशकर
संगीतकार: 
श्रीनिवास खळे
गीतकार: 
मंगेश पाडगांवकर

Thursday, May 26, 2011

झरे मेघ

झरे मेघ आभाळी तेव्हा
भान हरपुनी चिंब भिजावे
थेंबांचे इवलाले मोती
तळहातावर झेलून घ्यावे.

झरे मेघ आभाळी तेव्हा
मातीच्या गंधात भिजावे
धरुन बोट वा-याचे अलगद
डोंगर माथे चुंबुनी यावे.

झरे मेघ आभाळी तेव्हा
पाउसवेडा पक्षी व्हावे
क्षितीजावरल्या इंद्रधनुच्या
रंगामध्ये रंगून जावे.

झरे मेघ आभाळी तेव्हा
हळूच हिरव्या रानी जावे
ठायीठायीचे हिरवे यौवन
गात्रांमध्ये भरून घ्यावे.

आणि यातलं काहीच जनत नसेल तर...

झरे मेघ आभाळी तेव्हा
क्षणभर अपुले वय विसरावे
नाव कागदी घेऊन हाती
खुशाल डबक्याकाठी रमावे.

- गुरु ठाकूर

Tuesday, June 22, 2010

पडसाद....!

ओलेता गंधित वारा
आला घेउन सांगावा
पाझरला आतुर मेघ
त्या दूर अनामिक गावा

मनं चातक व्याकुळ वेडा
इतुकेच म्हणे हरखून
येइल मेघ माझाही
जाईल माला भिजवून

व्याकूळ अशी नक्षत्रे
कोरडीच केवळ जाती

भिजण्याच्या आशेवरती
कोमजुन गेल्या राती

मिटल्यावर डोळे अजुनी
ऐकते सरींचे साद
त्या तेंव्हाच्या भिजण्याचे
आंतरी अजुनी पडसाद

-गुरु ठाकुर

तशात पाउस

कातरवेळी बसलो होतो
आठवणींचा पिंजत कापूस
तशात पाउस .....
ठुसठुसणारे घाव पुराणे
विस्कटलेले डाव पुराणे
अन पुराणे काही उखाणे
सुटता झालो उगाच भावुक
तशात पाउस .....
त्यात कुठुनसा आला वारा
कापूस घरभर झाला सारा
पसार्यात त्या हरवुन गेलो
कधी अन कसा कुणास ठाउक
तशात पाउस .....

- गुरु ठाकुर

बहकीसी बारीश

बहकीसी बारीशने फीर
यादोंकी गठरी खुलवाई
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई

कुछ सुनेसे सन्नाटे थे
और ख्वाहीशें दबी दबी
यूँ रखें थे कुछ अरमान
छोड़ा हो जैसे अभी अभी
चद्दर सी उम्मीद मीली
कई जगह थी सील्वाई
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई

हर सीलवट मे ग्ठरीके
बुनेबुनाये ख्वाब मीले
भीगी चांदनी रातोंके
महकेसे महताब मीले
सीमटीसी खुदहीमे और
इक तहजीब नजर आयी
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई

- गुरु ठाकुर .

Wednesday, June 9, 2010

चल भिजू पावसात

चल भिजू पावसात
हरवलेल्या दिवसात.

डबक्यात उडी,
पाण्यात होडी.
गारा वेचू,
चिखलात नाचू.
कोसळली सर,
पानांवर धार.
हलव ते झाड,
थेंबांना सांड.
ओला मन शिंगा मोडून
जाउन बसे वासरात.

चल भिजू पावसात,
ओल्या चिंब दिवसात.

मातीचा गंध,
गाण्याची धुंद.
ओढ्याची ओढ,
भिजायची खोड.
ढगांचा ढोल,
वारयाशी बोल.
कडाडली वीज,
तरीपण भीज.
डोक पुसत आई म्हणेल,
कारे भिजला पावसात ?

-निखिलेश बागडे

चिंब पावसानं रानं झालं

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी

घननिळा, लडीवाळा

घननिळा, लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्या चा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा

सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो, गोपसुतांचा मेळा

घन ओथंबून येती

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

गार वारा हा भरारा

गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास

नभं उतरु आलं

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जन्माची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रितभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

नाच रे मोरा..

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

ओलेत्या पानात

ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले
डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले
साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची

डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला
वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला
थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले

स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी
राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी
तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले

हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा
शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू
अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले

रिमझिम धून

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्याेत गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्यातत आता, सुरात तुला मी कवळून

रिमझिम झरती

रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात

प्रासादी या जीवलग येता, कमळमिठी मध्ये संग भेटता
बरस असा की प्रिया न जाईल, माघारी दारात

मेघा असशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती नयने, करसी नीत बरसात

पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्याड, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा

पहिला पाऊस

पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण

पाऊस दाटलेला

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा

गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा

झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा

पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा

वादल वारं सुटल गं

वादल वारं सुटल गं, वार्यादनं तुफान उठलं गं
भिरिभर वार्यां त, पावसाच्या मार्याठत, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादल वारं सुटलं गं

गडगड ढगांत बिजली करी
फडफड शिडात, धडधड उरी
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुनी नाय
सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत
जागणार्यां डोल्यांत सपान मिटलं

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
कमरेत जरा वाकूनिया
पान्यामंदी जालं फेकूनिया
नाखवा माझा, दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यांत लुटलं

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना